विवाहपूर्व समुपदेशन-काळाची गरज.

 

-सुषमा दातार sushamadatar@gmail.com)

           " करायचंय काय विवाहपूर्व समुपदेशन? आमची लग्नं नाही झाली यशस्वी? आपली आपली अक्कल म्हणून असतेच की." काही वर्षांपूर्वी असं थेट म्हटलं जात असे.आता काही जण मनातल्या मनात म्हणतात.कारण स्पष्ट म्हटलं तर आपण जुनाट ठरू अशी भीती. समुपदेशनाची गरज तर वाटते पण नक्की का हवं ते मात्र कळत नाही अशी अवस्था असते.एक उदाहरण बोलकं ठरेल.एकदा एका बाईंचा फोन आला.त्यांच्या भाचीचं २३व्या वर्षी लग्न ठरलं होतं.वेळच्यावेळी आणि सर्वार्थानं अनुरूप स्थळ.दोघंही निवडीनं खुशीत होती.बाईंच्या मते दोघंही विचारानं आणि वागायलाही प्रगल्भ.तरीही बाईंना वाटलं की त्या दोघांनी विवाहपूर्व समुपदेशन घ्यावं.त्याला त्यांनी दिलेली कारणं होती,त्यांचा स्वतःचा घटस्फोट आणि मुलीच्या आईचं कसंतरी निभावलेलं लग्न.या साखरपुडा झालेल्या जोडप्याशी गप्पा मारल्यावर त्यांच फॅमिली प्लॅनिंग बद्दलचं अर्धवट ज्ञान आणि पुढे येऊ शकणाऱ्या, त्यांना माहीत असलेल्या पण प्रकर्षानं न जाणवलेल्या काही अडचणी समोर आल्या.

    "आता घटस्फोटांचं प्रमाण वाढलंय कारण आताची आत्मकेंद्री मुलं जुळवून घेण्यात कमी पडतात" अशी ठोबळ कारणं पुरेशी ठरत नाहीत समुपदेशनाची गरज सांगताना,विवाह संस्थेचं स्थान-महत्व डळमळीत का होतंय हे बघताना.तसं ते होत असलं तरी अजूनही बहुसंख्य माणसं लग्न करताहेत.घटस्फोटाचं प्रमाण प्रचंड असेल्या पाश्चात्य/विकसित देशांतही अनेक घटस्फोटित पुन्हा लग्न करताहेत.तेव्हा समाजात आणि वैयक्तिक जीवनातही अजून विवाहाला महत्व आहे हे मान्य करून काही प्रश्न विचारावे लागतील.पूर्वी किती विवाहेच्छू मुलामुलींचे पालक घटस्फोटित असायचे? किती जणांना पालकांचं लग्न अयशस्वी आहे,दोघं किंवा दोघातला एक दुःखी आहे हे कळायचं? किती जणांना वृत्तपत्र, टीव्ही,चित्रपट या प्रसार माध्यमांतून(ललित साहित्यातूनही) विवाहातले प्रश्न ठळकपणे दिसायचे? किती कुटुंबातल्या स्त्रीयांना (पुरुषांनाही) कुटुंबाचा संदर्भ सोडून आपापल्या आशा आकांक्षा असायच्या?"फारच थोड्यांना" हे सगळ्यांचं उत्तर आहे.आता यात बदल झालाय.त्यामुळे विवाहेच्छू मुलंमुली पाऊल पुढे टाकायला कचरताहेत.       

     फार प्राथमिक वाटेल पण एक स्पष्ट करावं लागेल. विवाह करणं आणि निभावणं हे नैसर्गिकरित्या येणारं कौशल्य नाही.कारण विवाह ही संस्थाच सामाजिक आहे. 'सर्व्हाव्हल इन्स्टिंग्ट' इतकी विवाहकौशल्यं सहज येत नाही. त्यामुळे इतर जीवन कौशल्यांप्रमाणे विवाहकौशल्यंही काही प्रमाणात शिकावी लागतात हे मान्य होईल.मग ते शिकायला मदत करणारे म्हणजेच समुपदेशक मान्य होतील. कधी ते विशेष तज्ज्ञता प्राप्त केले असतील, ओळखीतले "फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असतील" किंवा पालक असतील.

    लग्न कशी ठरायची,ठरतात हेही बघावं लागेल. कुटुंबातल्या कर्त्या माणसानं सामाजिक नियमात बसवून लहान वयात ठरवलेलं लग्न,तशाच निवडीनं पण जरा मोठ्या वयातलं लग्न,मग मुलींना थोडं शिकवून मग लग्न, "आम्ही निवडलेल्यातलं एक स्थळ निवडण्याचं स्वातंत्र्य तुमचं" असं,मुली अर्थार्जन करू लागल्याच्या टप्प्यावरचं लग्न, "तुमचा तुम्ही जोडीदार निवडा पण आमची पसंती असल्याशिवाय लग्न करू नका" असे प्रकार. आता आपले आपण ठरवलेले विवाहही बरेच होतात (हे प्रेमविवाहच असतात हाही गैरसमज.'एकानं दुसऱ्याला गटवलेले', उभयतांना जुळतं वाटल्यानं ठरवलेले, सहवासातून जुळलेले असेही प्रकार असतात.) समुपदेशनासाठी विवाह ठरण्या ठरविण्याची विविधताही लक्षात घ्यावी लागतेय. सध्या बहुतांशीवेळा असं दिसतं की करियर, व्यक्तिविकास,भौतिक सुख या बाबतीत जागतिकीकरण मान्य केलंय पण विवाह, जोडीदार यांच्या बाबतीत मात्र जुन्याच्या जवळच्या, सुरक्षित प्रदेशात रहायचंय अनेकांना.त्यासाठी 'कौटुंबिक,आर्थिक गुंत्याची अपरिहार्यता' अशी सबबही दिली जाते.दोन काळात एकाच वेळी राहू पाहणाऱ्यांना समुपदेशनाची गरज असते.

    प्रत्येकाचा वेग असतो आपलं आपण अनुभवातून शिकण्याचा,स्वतःत बदल घडवायला शिकण्याचा, बदलत्या मानव निर्मित व नैसर्गिक परिसराशी जुळवून घेण्याचा, परिसराला आपल्या योग्य करत जाण्याचा.त्या मानाने आता परिसर फारच वेगानं बदलतो आहे.या वेगाच्या असमतोलामुळेही समुपदेशनाची गरज भासतेय.स्पर्धेच्या युगाचा ताण आहे तसंच याच युगानं अर्थार्जनाचे-करियरचे असंख्य पर्यायही दिले आहेत,छंद आणि व्यवसाय यांची आता सांगड घालता येते.हे सांगावं लागतं.तसंच '"लॉंग डिस्टन्स मॅरेज"ची दखलही घ्यावी लागते आता समुपदेशनात.

    प्रत्येकाला विवाहकौशल्यं शिकण्यासाठी उपलब्ध असलेले नमुने(मॉडेल्स)आता खूप वेगवेगळे असतात (प्रत्यक्ष,मीडियातले आणि व्हर्च्युअल). दिसलेल्या,ऐकलेल्या, अनुभवलेल्यातलं कोण,काय, किती घेतं,किती सोडतं त्यावर ठरतात विवाहसंस्थेविषयी, जोडीदाराविषयीच्या कल्पना, जोडीदाराकडून आपल्या आणि आपल्याकडून जोडीदाराच्या अपेक्षांविषयीच्या धारणा, समज, गैरसमज.समाजही काही मिथकं तयार करत असतो(उदा.आपापल्या जातीत लग्न केलं तर जमवून घ्यायला सोपं असतं.).काही वेळेला छोट्या गोष्टींवरून मोठे,चुकीचे,पक्के निष्कर्ष काढले जातात,अवास्तव शिक्के मारले जातात,माणसांचे-अनुभवांचे कप्पे केले जातात.(उदा.कॉन्व्हेंट मधे शिकलेले लोक अधुनिक असतात,लहान शहरातले-गावातले लोक विचारानं मागासलेले असतात इ.) बरेच वेळा असं करणाऱ्यांचं आत्मपरीक्षणाचं कौशल्यंही कमी पडतं.समुपदेशक या सगळ्याची तपासणी करायला उद्युक्त करतात.

     एक उदाहरण बघू. वैवाहिक समस्या घेऊन आलेल्या एम बी ए केलेल्या मुलीला संवाद कौशल्याचा,प्राधान्यक्रम ठरविण्याचा काही भाग सांगताना मी सहज म्हणाले "हे खरं तर तुला सांगायची गरज नाही तू मॅनेजमेंटची अभ्यासक आहेस." त्यावर तिची प्रतिक्रिया "शिकलेय मी हे सगळं.त्यातलं बरंच कामाच्या ठिकाणी वापरतेही.पण वैवाहिक-कौटुंबिक नात्यात तेच ज्ञान वापरता यईल हे नव्हतं लक्षात आलं. मी फक्त 'मी' च्या चष्म्यातून पहात होते." अनुभवातून सहजपणे सगळेच शिकतात असं नाही हे पुन्हा शिकवून गेली ही प्रतिक्रिया. एकुणातच सध्या सुखवस्तू घरांमधून मलींना मुलांसारखं वाढवलं जातंय आणि मुलांनाही मुलांसारखंच.त्यांच्या शिक्षण आणि करियरला इतकं महत्व दिलं जातंय की संसार कौशल्यात दोघंही कमकुवत राहताहेत.संसारातलं सगळं आउट सोर्स करता येत नाही.तसं केलं तर घराचं हॉटेल व्हायला वेळ लागत नाही हे कळलं की समस्या येतात.त्यासाठीही समुपदेशन लागतं.   

      रीतसर विवाहपूर्व समुपदेशन म्हणजे विवाह नावाच्या सामाजिक,कायदेशीर,कृत्रिम नात्याचं रूपांतर वैयक्तिक सुखासमाधानाच्या,जोडीनं निभावायच्या,लांबपल्ल्याच्या नात्यात रूपांतर करण्याची पूर्वतयारी. स्वओळख आणि स्वतःची विवाहयोग्यता तपासणं हा या समुपदेशनातला सगळ्यात महत्वाचा भाग.त्यानंतर परस्पर जुळणीचा आणि (priorities) प्राधान्यक्रम ठरविण्याचा भाग येतो.या प्रक्रियेत विचाराची साधनं दिली जातात. विवाह ठरल्यावर आलेल्या,जाणवलेल्या किंवा वैवाहिक भविष्यात दिसणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठीचे पर्याय,स्वतःला वळवून वाकवून विवाहायोग्य घडविणं,शंका-भीती यांचं निरसन करून घेणं हेही येतं.परंतु विवाहपूर्व समुपदेशन म्हणजे तमाम वैवाहिक समस्या टाळण्याचा अक्सिर इलाज नाही.कारण प्रत्येकाचं वैवाहिक जीवन वेगळं असतं.विवाहात प्रवेश करताना बरोबर आणलेला भूतकाळ वेगवेगळा असतो.

     साधारणपणे विवाहपूर्व समुपदेशनात पुढील मुद्दे वैयक्तिक आणि परस्पर जुळणीच्या अनुशंगानं अभ्यासले जातात. १.संवादकौशल्यं (बोलण्या-ऐकण्याची,न पटणारंही ऐकून घेण्याची कौशल्यं,नकोत्या गोष्टी उकरून न काढता हेतूला धरून बोलणं,सकारात्मक-नकारात्मक भावना योग्य तऱ्हेनं व्यक्त करता येणं, इतरांना व्यक्त करायला वाव देणं इ.) २.समस्या निवारण कौशल्यं ३.विवाहाकडून अपेक्षा (असंख्य अपेक्षा विवाहातूनच पूर्ण झाल्या पाहिजेत असं समजणारी मुलंमुली बरीच आढळतात.)-वास्तव,अवास्तव ४.व्यक्तिमत्वाचे पैलू (स्वभाव वैशिष्ट्ये,सर्वसाधारण वागणुक,समानता-आदर संकल्पना इ.) ५.अर्थकारण-अर्थिक नियोजन,पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जीवनशैली ६.लैंगिक जीवन (लैंगिक अपेक्षा,क्षमता,लैंगिक गरजपूर्तीचा प्राधान्यक्रम, लिंगभाव-जेंडर रोल्स.कुटुंब नियोजन,इंटरनेट-इतर माध्यमांतून उपलब्ध होणाऱ्या 'सेक्स कंटेंट' मुळे तयार होणाऱ्या अवास्तव कल्पना/मिथ्स इ.) ७.धार्मिक धारणा (नास्तिकता, निधर्मीपणा, सर्वधर्म समाभाव विचार,श्रद्धा,धर्माविषयी आचार-विचार,कर्मकांड इ.) ८.विवाहतल्या भूमिका/स्थान. (एकत्र किंवा स्वतंत्र कुटुंबातली अर्थार्जनाची,सांसारिक जबाबदारी.नातेसंबंध इ.) ९.विरंगुळ्याचे मार्ग/साधने (एकत्रित/स्वतंत्रपणे करावयाचे,कृतिशीलता आणि टीव्ही सारखा आयता विरंगुळा वापरणं,छंद असणं नसणं इ.) १०.सामाजिक व्यक्तिमत्व (नातेसंबंध, मित्रपरिवार,त्यांचे प्राधान्यक्रम, राजकीय/सामाजिक बांधिलकी,मूल्यव्यवस्था इ.)११.शारीरिक-मानसिक आरोग्य, तंदुरुस्ती (स्वतःचे,अनुवंशिक-कुटुंबियांचे. परस्पर संमतीने,वैद्यकीय सल्ल्याने वैद्यकीय चाचण्या.) १२.मुलं आणि पालकत्व.

   यातल्या बऱ्याचश्या मुद्द्यांच्या अंतर्गत करिअर आणि कुटुंबाचा समतोल राखण्याचा मुद्दा येतो म्हणून तो स्वतंत्र दिलेला नाही.   

    या मुद्द्यांच्या जोडीला काही समुपदेशक वैयक्तिक कुवती,भावनिक बुद्धिमत्ता,कम्पॅटिबिलिटी इत्यादींसाठी मानसशास्त्रीय टेस्टही देतात.तशा त्या हल्ली इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. परंतु समुपदेशकाची प्रत्यक्ष भेट याला तो पर्याय होऊ शकत नाही.समुपदेशनामुळे विवाहातला रोमान्स संपतो,नवं काही 'डिस्कव्हर' करण्याचा आनंद कमी होतो असेही काहींचे गैरसमज असतात. दोघांमधला रोमान्स,एकमेकांमधलं छान छान शोधणं हा दोघांचा मामला असतो.तिसरं कुणी नाही त्यात बेरीज वजाबाकी करू शकत.विवाहपूर्व समुपदेशन तर नाहीच नाही.

 विवाहपूर्व समुपदेशनाचे/मार्गदर्शनाचे प्रकार- १.पालकांचं समुपदेशन/मार्गदर्शन- .आपल्याकडे विवाह ही अजूनही कौटुंबिक संदर्भ असलेली बाब आहे.त्यामुळे विवाह ठरलेल्या जोडप्यांच्या पालकांसाठीही कधी कधी समुपदेशन आवश्यक ठरतं.विशेषतः पालकांच्या मनाविरुद्ध विवाह होत असेल तर किंवा प्रचलित प्रथेच्या विरुद्ध जाऊन होणारा विवाह असेल तर.                                                             . मुलामुलींचे जोडिदाराविषयीचे निकष,अपेक्षा पालकांपेक्षा खूप वेगळे असले म्हणजे जोडीदार शोधाच्या प्रक्रियेदरम्यान अनेक वेळा पालकांना समुपदेशनाची गरज लागते.                 . मुलंमुली विवाह करण्यास उत्सुक नाहीत,वय मोठं असूनही आत्ता नको म्हणताहेत,विवाह नकोच म्हणताहेत अशांचे पालक स्वतःच्या समुपदेशनासाठी येतात. "तुम्ही आमच्या मुलांना समजावून सांगा" असं म्हणतात.अशा मुलामुलींनी समुपदेशनासाठी यावं अशी पालकांची इच्छा असते.पण मुलं मुली आपल्या विचारावंर किती ठाम आहेत त्यावर ठरतं ती समुपदेशनासाठी येतील का नाही ते. २.विवाह ठरलेल्यासाठी एकट्यानं आणि दोघांनी घेतलेलं समुपदेशन- याचे पैलू मुख्य लेखात आहेत. ३. जोडीदार निवडीची प्रक्रिया सुरू करण्या आधीचं समुपदेशन /मार्गदर्शन - जोडीदार निवडीची प्रक्रिया तणावरहित व्हावी, आपली विवाहयोग्यता तपासता यावी, जोडीदाराविषयीच्या अपेक्षा व्यावहारिक,रास्त,वास्तव असाव्यात यासाठी माग्दर्शन/समुपदेशन. ४.जोडीदार निवडीची प्रक्रिया चालू केलेली असताना - विवाह ठरायला फार उशीर होतोय.अरेंज्ड मॅरेज या प्रक्रियेचा ताण येतोय,चांगली स्थळं येत नाहीत.नकार खूप येतात.होकाराचा निर्णय करता येत नाही.यांची कारणं शोधायची आहेत.स्वातंत्र गमावाची भीती वाटते. यासाठीचं मार्गदर्शन/समुपदेशन. साथसाथ विवाह अभ्यास मंडळात हे वैयक्तिक रित्या किंवा गटांसाठीच्या कार्यक्रमांतून केलं जातं. ५.विवाहावर प्रश्न चिन्ह लावणाऱ्यांसाठी- योग्य जोडीदार मिळत नाही म्हणून अविवाहित राहण्याचा निर्णय घ्यावा काविवाह करावा का नाही?  सामाजिक-कौटुंबिक दबाव असताना विवाह न करण्याचा पर्याय स्वीकारता येईल का ? असे प्रश्न घेऊन येणाऱ्या मुलंमुलींसाटी मार्गदर्शन/समुपदेशन.            

        

 

        

Tags: