विवाहवेध११-ग्रह आणि आग्रह

ग्रह आणि आग्रह

          आपल्याला काय हवंय ते स्पष्टपणे समजणं,ते सांगता येणं हे उपयोगी पडणारं कौशल्य. पण हे 'समजणं' जर चुकीच्या ग्रहांवर आधारित असेल तर मात्र ते अडचणीचं ठरतं.हे ग्रह म्हणजे पत्रिकेतले नव्हेत बरंका.मग कोणते ते उदाहरणातूनच बघू. ती आणि तो, मॅट्रिमोनियल साईटवरून काही दिवस एकमेकांच्या संपर्कात असलेले. ती मुंबईच्या ज्या उपनगरात रहायची त्या लोकल स्टेशनवर विशिष्ट ठिकाणी भेटायचं मग कुठे तरी निवांत बसून बोलायचं असं ठरलं.ही भेट झाल्या नंतर बोलताना ती म्हणाली "मला नाही वाटत हे पुढे जाईल.तो आला तोच मुळी घाम पुसत. नर्व्हसपणाचं लक्षण वाटलं. मग मलाच विचारलंन कुठे जाऊया आपण.कुठे जायचं तेही याला ठरवता नाही येत का ? इनिशिएटिव्ह नसल्यासारखाच वाटला."

    हे वाचताना ग्रह म्हणजे काय ते लगेचच लक्षात येईल तुमच्या. इतकी पटकन लेबलं लावणाऱ्या मुलीला तुम्ही हसालही कदाचित पण हे हास्यास्पद नाहिये. असे ग्रह करून घेणं आणि अशी सरसकट लेबलं लावणं हे मला हल्ली अनेक विवाहेच्छू मुलामुलींशी आणि पालकांशी बोलताना लक्षात येतं. या मुलाचा जोडीदार म्हणून विचार सोडून देण्याची अनेक कारणं तिच्याकडे असण्याची शक्यता आहेच. पण ती रास्त आहेत का,तर्क सुसंगत आहेत का आणि ती पडताळून घेता येतील का हे पाहता येतंच. "मुंबईत लोकलमधून प्रवास करून आलेला मुलगा घाम पुसेल नाही तर काय करील? तुझ्या निवासी भागात तो आलेला असताना कुठे जाणं सोयीचं हे तुला विचारणं योग्य आहे ना ?" असे प्रश्न विचारल्यावर ती चपापली. तिच्याशी अनेक वेळा संवाद झाल्यावर लक्षात आलं, एरवी उत्तम करिअरवाली हुशार मुलगी असली तरी जोडीदार निवडीच्या बाबतीत छोट्या छोट्या बाबींमधून झटकन निष्कर्ष काढण्याची तिला सवय आहे आणि अपेक्षांमधे काही विसंगतीही आहेत. खूप वर्षं प्रयत्न करूनही तिला जोडीदार न सापडण्याची तीही कारणं आहेत.

        असे छोटे छोटे अनुभव जेव्हा मुलामुलींच्या गटात चर्चेला येतात तेव्हाच्या प्रतिक्रियाही बघण्यासारख्या असतात.हाच अनुभव गटात सांगितल्यावर एक मुलगी म्हणाली  "तो मुलगा आहे म्हणजे त्याला सगळे निर्णय इनिशिएटिव्ह घेऊन पटकनच घेता आले पाहिजेत आणि तो कुठल्याही परिस्थितीत आत्मविश्वासपूर्णच दिसला पाहिजे असा तिचा समज असणार." मग एखादा मुलगा म्हणतो "ती जरा जुन्या पठडीतली असणार.म्हणजे पुरषांनी पुढाकार घ्यायचा आणि मुलीला एखाद्या कॅफेत न्यायचं आणि बीलही त्यानंच द्यायचं.हल्लीचं टीटीएमएम माहीत नसणार तिला." यावर हशा येतो.पण कुणी कुणी अंतर्मुखही होतात.

    एकदा एक मुलगा त्याचा 'चहापोहे' अनुभव सांगत होता."आमच्यात मोठी माणसं असताना मुलानं मुलीला प्रश्न विचारायची फारशी पध्दत नाही.पण माझे जीजाजी होते बरोबर त्यांनी मला सांगितलं विचार म्हणून.मी आपला सोपा प्रश्न विचारला-तुझे छंद कोणते? तर ती म्हणाली मला टीव्ही बघायला आवडतो.घ्या !! आता यापुढे काय विचारणार !!" काही मुलींनी त्याचा शब्द खाली म्हणून पडू दिला नाही. "तू खूप वाचणारा आहेस म्हणून टीव्ही बघण्याची आवड तुच्छ समजतोयस का? टीव्हीवरचं ती काय बघते हे तुला विचारता आलंच असतं.तिच्याबाहेर जाण्यावर बंधनं असतील तर ती घरात बसून टीव्ही बघेल नाही तर काय करेल?" चर्चेचा रोखच 'झटपट ग्रह करून घेण्याचे तोटे' असा झाल्यानं एक जण म्हणाला "तिनं प्रामाणिकपणे सांगितलंन ते बरं.नाहीतर आवडीनं टीव्ही बघायचा पण चारचौघात आपण त्यातले नाही म्हणणारे खूप असतात." मग कुणी पंडिती धाटणीनं म्हणतं "टीव्ही बघण्याला 'छंद' म्हणणारी, त्याची आवड असलेली माणसंही चांगली माणसं असू शकतात.तिच्याकडे जीवनावश्यक अशी काही कौशल्यं तुझ्यापेक्षा अधिकही असतील कदाचित." यातल्याच काही मुलामुलींनी स्वतः अशाच चुका केलेल्या असतात हेही अशा चर्चांतून त्यांना उलगडतं.

     'आता घरचे लग्नाबद्दल घाई करायला लागलेत' या स्टेजला असलेली विशाखा गप्पा मारायला आली होती तेव्हाही 'झटपट आणि चुकीचे ग्रह' हा विषय ओघानंच निघाला. तेव्हा तिनं तिचा अनुभव सांगितला "एका स्थळाची चौकशी करायला माझ्या आईनं फोन केला होता.मुलाच्या आईनं फोन घेतला आणि जरा उद्धटपणानंच बोलल्या त्या असं आईला वाटलं.तिनं मला तो संवाद सांगितल्यावर मला वाटलं नकोच आता पुढे चौकशी करायला. पण तेव्हा माझी एक मावशी आलेली होती तिनं सांगितलं "बहुतेक मी ओळखते या मंडळींना.तुम्ही पुन्हा बोला नीट त्यांच्याशी.आधीच ग्रह करून घेऊ नका." आणि खरंच तसं झालं आम्ही प्रत्यक्ष भेटायला गेलो तर त्या इतक्या आवडल्या आम्हाला शिवाय त्याच सॉरी म्हणाल्या त्या दिवशीच्या फोनकॉल बद्दल.त्या कुठलातरी प्रॉब्लेम सोडवण्यानं त्रासलेल्या होत्या आईचा फोन गेला तेव्हा.पुढे काही मुद्द्यांवर माझं आणि त्या मुलाचं नाही जमलं.पण अजूनही आम्ही सगळे कुठे भेटलो तर छान बोलतो."

    कामानिमित्त महिना महिना प्रवास करावा लागणारऱ्या एका मुलाचा 'नोकरी करणारी मुलगी हवी.' असा आग्रह होता. अर्थातच अशी अपेक्षा असायला काहीच हरकत नाही.पण त्याच्या या अपेक्षेमागचं कारण होतं "माझ्या अनुपस्थितीत तिला पैशाचे आणि घराबाहेरचे इतर व्यवहार नीट सांभाळायची सवय असेल.म्हणजे ती व्यवहाराला हुशार असेल." त्यानं गृहित धरलेलं                     'नोकरी करणारी = व्यवहाराला हुशार' हे समीकरण तपासायचीही गरज नाही. आजूबाजूला डोळे उघडून पाहिलं तरी कळेल. गृहिणी असलेल्या व्यवहारचतुर स्त्रीया आणि नोकरी करत असूनही ज्यांना घराचेच काय स्वतःचे पैशाचे व्यवहारही नीट बघता येत नाहीत आणि पूर्णपणे पालकांवर किंवा नवऱ्यावर अवलंबून अशाही स्त्रीया दिसतात. शिवाय लग्न होई पर्यंत फारसे काही घरचे-बाहेरचे व्यवहार माहीत नव्हते पण वेळ आल्यावर ते अनुभवातून शिकून स्वतःचे आणि वयस्क पालकांचेही व्यवहार छान सांभाळणाऱ्या नोकरी करणाऱ्या-न करणाऱ्या स्त्रीयाही दिसतात.हेच उलटं पुरुषांबद्दलही दाखवता येईल. प्रश्न गरजेप्रमाणे कौशल्यं आत्मसात करण्याला तयार असण्याचा-नसण्याचा आहे. अपेक्षा आणि आग्रह यातला फरक समजून घेण्याचा आहे.         

    पुण्यात जिमखान्यावर राहणाऱ्या एका मैत्रिणीचा अनुभव तर या उदाहरणांचा कळसच.तिनं तिच्या ओळखीतल्या तथाकथित "उत्तम स्थळ" या लेबलाच्या एका मुलीला (म्हणजे सुंदर, स्मार्ट,कलाकार,हुशार,मिळवती,ऑल राउंडर वगैरे) ओळखीतल्या,गावात सदाशिव पेठेत राहणाऱ्या एका मुलाचं स्थळ सुचवलं. ती मुलगी म्हणाली "मला नदीच्या त्या बाजूकडचा जोडीदार नकोय." त्या मुलाचं 'गावात' रहात असूनही कॉनव्हेंट स्कूल मधलं शिक्षण,मेरिटवरचं उच्च शिक्षण,रूप, गुण, आर्थिक स्तर,उच्च शिक्षणाची आणि स्त्रीपुरुष समानतेची कुटुंबातली परंपरा हे काही म्हणजे काही पोचलंच नाही तिच्यापर्यंत.गावातली मुलं जिमखान्यावरच्या मुलांपेक्षा कमी स्मार्ट किंवा गावंढळ किंवा तत्सम काही ग्रह आणि माझ्याच (भौगोलिक दृष्ट्या संकुचित) भागातला असावा हा आग्रह या दोन्ही गोष्टी एकत्र आलेल्या दिसतात इथे.हे फक्त अशा उच्चभ्रू मुलामुलींमधेच दिसतं असंही नाही.लहान शहरातल्या, गावातल्या,वेगवेगळ्या आर्थिक-शैक्षणिक स्तरांमधल्या मुलामुलींचेही असे ग्रह आणि आग्रह असतात.फर्स्ट इंम्प्रेशन आणि आपलं मत महत्वाचं असलं तरी ते अंतिम सत्य नाही हे कळेलच या ग्रहाच्या-आग्रहाच्या गोष्टींमधून.  

Tags: