विवाहवेध १०-रूप पाहता

रुप पाहता
(26-05-2013 : 00:40:50)  

 
- सुषमा दातार

‘मुलाशी माझं ईमेलवरून किंवा त्याच्या पालकांशी माझ्या पालकांचं फोनवरून प्राथमिक बोलणं झाल्याशिवाय मी माझा फोटोच पाठवत नाही आता.’ असं म्हणणारी सुमिता स्मार्ट, उच्चशिक्षित, चांगले करिअर असलेली आहे. प्रत्यक्ष बघायच्या आधी बरंचसं जुळतंय असं म्हणणारं स्थळ भेट झाल्यावर किंवा फोटो पाठवल्यावर तिचा कृष्णवर्ण आणि बेताची अंगयष्टी लक्षात येऊन नकार देतं. अरेंज्ड मॅरेजच्या संदर्भात अशी ‘दिसण्याची’ अडचण अनेकांना विशेषत: मुलींना जाणवते. ‘दिसायला बेताच्या मुला-मुलींना लग्न करायचा हक्कच नाहीये का आता?’ असं काकुळतीनं विचारणारं कुणी भेटलं की पोटात तुटतं अगदी. असाच एक अनुभव एका मुलीचा, एका वधू-वर मेळाव्यातला. आपल्या जोडीदार निवडीच्या पद्धतीला चपराक देणारा ओघानंच आपल्यालाही चपराक देणारा आहे. 
‘स्टेजवर येऊन आपापली ओळख करून द्यायची किंवा गटात बसून एकमेकांशी ओळख करून घ्यायची अशी पद्धत न वापरता दोन-दोन मिनिटं प्रत्येकाशी बोलून पुढे जायचं मग निवडण्यासारख्यांची नोंद ठेवायची आणि त्यांच्याशी अधिक ओळख करून घेण्यासाठी नंतर परत बोलायचं, अशी पद्धत होती मेळाव्याची. दोन मिनिटांचा भाग पूर्ण झाल्यावर आम्ही चार-पाच जणी बाजूलाच पडलो. कुणीही आमच्याशी बोलायचा प्रयत्न करेना. दिसायला चांगल्या मुलींशी बोलणार्‍यांची गर्दी उडाली. मी धाडसी असल्यानं पुढाकार घेऊन मुलांशी बोलायचा प्रयत्न केला; पण काहीही प्रतिसाद मिळाला नाही. मीही बाजूला पडले त्या मुलींबरोबर. त्यातली एक दिसायला अँव्हरेज पण बुजरी होती. दुसरी एक-जिला साधारणपणे शामळू म्हटलं जाईल अशी, या दोघी कमावत्या, उच्चशिक्षित पण रडायलाच लागल्या. मी त्यांच्या पाठीवर हात ठेवून बसले बराच वेळ. आता माझं लग्न झालंय; पण तो प्रसंग डोळ्यासमोर येतो. असा अनुभव मुलांनाही येतो का पहायला हवं.’ हताश वाटलं ते ऐकून. हे नक्की बदलायला पाहिजे. 
रूढ अर्थानं डावं रूप मिळालेल्या मुला-मुलींचे गुण पारखले जायचे आणि त्यामुळे दिसण्यातला डावेपणा गौण ठरण्याची शक्यता फक्त परिचयोत्तर विवाहात असणार. तसे अपवादात्मक विवाह यशस्वी झालेलेही दिसतात. पण फक्त दर्शन-पसंती असलेल्या पद्धतीत ती शक्यता दिसत नाही. इतर काही उदाहरणंही पाहू. असीम दिसायला चांगला, उच्चशिक्षित, व्यवसायात चांगलं कमावणारा आहे; पण लहान शहरात राहतो म्हणून त्याला नकार येतात. मनीषाही स्मार्ट, नीटस रूपाची आणि चांगला पगार असलेली मुलगी; पण ती त्यांच्या जातीच्या/ समाजाच्या मानानं जास्त शिकलेली म्हणून तिला नकार येतात. एखाद्याला जातीच्या-समाजाच्या मानानं कमी शिकलेल्यालाही बरं रूप असून नकार येतात. नीता दिसायला सुंदर म्हणता येईल अशी, उच्चशिक्षित मुलगी; पण तिचा काका अपघातात अपंग झालेला (मेंदूवर परिणाम झालेला) आहे. त्याची जबाबदारी तिच्या वडिलांनी घेतलेली आहे. तिचा फोटो पाहून सगळीच स्थळं तिला पसंत करतात. काकाबद्दलची माहिती कळली म्हणजे नकार येतो. त्याचं अपंगत्व आनुवंशिक नाही हे कळूनही. या उदाहरणावरून कळेल रूप असलं म्हणजे सगळे प्रश्न सुटतात असंही नाही.
असं असलं तरी दिसण्याचा मुद्दा आत्ताच्या पद्धतीत पूर्णपणे वगळता येत नाही. ‘बाह्य सौंदर्यापेक्षा आतल्या सौंदर्याला, वागणुकीला, विचारांना अधिक महत्त्व असतं’ वगैरे वगैरे कितीही गप्पा केल्या तरी आपलं बोलणं, वागणं, स्वभाव समोरच्याला कळायच्या आत आधी आपण एकमेकांना ‘दिसतो’ आणि विशिष्ट इम्प्रेशन पडतं. आपल्या दिसण्याबद्दल आणि त्यामुळे येणार्‍या नकारामुळे हताश होणारी मुलं-मुली मग व्यक्तिमत्त्व विकासासाठी लोकप्रिय स्वमदत-पुस्तकांची मदत घेतात. ही पुस्तकं सांगतात की, स्वत:वर प्रेम करता आलं पाहिजे, स्वत:ला आहे तसं स्वीकारता आलं पाहिजे. हे खरं आहेच; पण याचा अर्थ अनेक जण नीटसा समजून घेत नाहीत. आपला स्थूलपणा, आपलं चुटचुटीत नसणं, आपला वेंधळेपणा, आपली गबाळी राहणी हेसुद्धा आहे तसं स्वीकारलंय असं म्हणतात. त्यातून लग्न ठरण्याचा प्रश्न सुटत नाही. कारण इथे प्रश्न इतरांनी मला स्वीकारण्या, न स्वीकारण्याचाही आहे. 
त्यासाठी माझ्या दृश्य व्यक्तिमत्त्वातलं काय मला बदलता येईल, ज्यामुळे मलाच माझी दृश्य प्रतिमा अधिक चांगली वाटेल? असा विचार करता येईल. आपल्या जाडीमुळे आपलं लग्न ठरत नाहीये हे कळत असून त्याबद्दल काहीही हालचाल न करणार्‍या मुली बर्‍याच भेटतात हल्ली. ‘इतरांसाठी मी का म्हणून बदलू? मला आहे अशीच स्वीकारणारा भेटेल तेव्हा करीन. नाही तर अशीच राहीन’ अशी अरेरावी विचारसरणीही दिसते. आरोग्यासाठीही जाडी कमी करणं योग्य असा व्यवहार्य विचार येत नाही मग ‘लग्न म्हणजेच आत्मसन्मान न सोडता एकमेकांसाठी बदलणं असतं, त्यात दिसणंही आलं’ हा विचार कुठून येणार? अगदी घरात पिढीजात डायबेटीस असलेली मुलं-मुलीही आकार ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत नाहीत. मला इतरांनी आहे तसंच स्वीकारावं असं वाटत असेल तर मलाही इतरांच्या जाडीचा, एकुणातच रूपाचा निकष गौण मानता यायला हवा ना! दिसण्याचा विचार इतरांकडूनच काय माझ्याकडूनही टाळला जात नाही तर स्वत:च्या दिसण्याचा विचार करावा लागेल ना? प्रत्येकाला आरसा सांगेलच तुझी उंची सरासरीपेक्षा खूपच कमी आहे. सर्वसामान्यांना आवडतो त्यापेक्षा तुझा रंग चांगलाच डावा आहे. तुझी जाडी अंमळ जास्त आहे किंवा फारच कमी आहे.. असं बरंच काही. असं स्वत:चं रूप वस्तुनिष्ठपणे निरखल्यावर एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. काही निकषांवर मी जर सरासरीपेक्षा, सर्वसामान्यांपेक्षा डावीकडे झुकत असेन तर मीही अशा डावीकडे झुकणार्‍यांचा विचार जोडीदार म्हणून करावा हे न्याय्य ठरेल नाही का? त्यानंतर माझ्यातल्या बदलता येणार्‍या आणि निसर्गदत्त-बदलता न येणार्‍या गोष्टी कोणत्या हेही बघता येईल. रंग काळा असला किंवा त्वचा तितकी छान नसली तरी हसतमुख असणं, टक्कल पडायला लागलं असलं तरी चालण्यात आत्मविश्‍वासाचा डौल असणं आपल्या हातात असतं ना ! 
(सध्या शारीरिक, मानसिक अपंगत्व असलेल्यांची उदाहरणं बाजूला ठेवू.) माझं शरीर आरोग्यपूर्ण आणि रोजचे जीवनव्यवहार करायला सक्षम आहे का? क्षमतेच्या एक पाऊल पुढे जाऊन मला काही करता येतं का? हे प्रश्न ‘माझं रूप कसं?’ या प्रश्नापेक्षा महत्त्वाचे. त्यांचं उत्तर हो आलं तर त्याची परिणती बरं दिसण्यात होण्याची शक्यता असते. कारण आपली क्षमता कळण्यातला, ती वापरून बघण्यातला आत्मविश्‍वास, आनंद डोळ्यातून, चेहर्‍यावरून, देहबोलीतून दिसतो. मग इतरांना आपण आवडण्याची शक्यता वाढते. परंतु प्रसारमाध्यमं आपल्याला फक्त वरवरच्या उपचारानं सुंदर दिसण्याची स्वप्नं दाखवतात. प्रसारमाध्यमं नव्हती तेव्हाही ‘एक गोरी दहा गुण चोरी’ ही म्हण प्रचलित होतीच. 
म्हणूनच मला आरशात स्वत:कडे वस्तुनिष्ठ पद्धतीनं बघता आलं पाहिजे. इथे आरसा म्हणून मला जे अभिप्रेत आहे तो ‘तू किती छान आहेस किंवा छान नाहीस’ असंच फक्त सांगणारा अभिप्रेत नाहीये. सध्या आपण दृश्य प्रतिमांनी वेढलेल्या जगात राहतोय. त्यातून सौंदर्याचे मापदंड समाजाला मिळताहेत आणि रूढ होत आहेत तसेच प्रतिमाविश्‍वातल्या बदलाप्रमाणे बदलताहेत. या मापदंडाचे बळी ठरून आपण दु:खी व्हायचं नाहीये. तरी आपलं व्यक्तिमत्त्व खुलवायचा प्रयत्न तर करावाच लागेल. आपण दिसण्याच्या मापदंडात कमी पडत असू तर इतर काही बाबीत सरस ठरू शकतो का, हेही पहावं लागेल. तरीही नकार येत राहिले तर मात्र स्वत:च्या जीवनाचं, आनंदाचं सुकाणू स्वत:च्या हातात घेऊन सकस जगायचे प्रयत्न करायला हवेत. लग्न हेच जीवनाचं एकमेव केंद्र नाहीये हे अनेकांनी सिद्ध केलं आहेच. याचबरोबर रूपाच्या मापदंडात कमी पडणार्‍यांना निदान माणूस म्हणून आदरानं वागवण्याची आदब तरी प्रत्येकात यायलाच हवी. त्यातूनच अनेकांना चेहर्‍यापलीकडचं व्यक्तिमत्त्व आणि क्षमता पाहण्याचं कौशल्य कमावता येईल आणि जोडीदार निवडीचं क्षेत्र विस्तारता येईल.

Tags: