Info in Marathi

स्थापना- आपल्या देशात नव्वदच्या दशकात जे आर्थिक बदल झाले,जागतिकीकरणाची आणि खुल्या अर्थव्यवस्थेची सुरवात झाली . त्याचे वैयक्तिक आणि समाजजीवनावर अनेक प्रकारांनी परिणाम जाणवू लागले . शिक्षण, व्यवसाय, नोकऱ्यांच्या नवनव्या संधी दिसू लागल्या. वाढत्या संधींबरोबर स्पर्धाही वाढली . स्त्रीयांसाठीही अनेक क्षेत्र खुली झाली. त्याचा प्रभाव विवाहसंस्थेवर पडला.

अनेक तरुण तरुणींना विवाहविषयक प्रश्न पडू लागले. जीवनात विवाहाचं स्थान काय ? आपापला किंवा इतरांच्या मदतीनं ठरवून , कुठल्याही पद्धतीनं केला तरी जोडीदाराची योग्य निवड कशी करायची ? विवाह करताना अधुनिक, पारंपरिक किंवा दोन्हींच्या समन्वयानं काही पध्दती ठरवता येईल का ? जोडीदाराची निवड, विवाह समारंभ आणि विवाहानंतरचा जीवन व्यवहार यात काळानुरुप कोणते बदल करायला हवेत ? शिक्षणाचा  सदुपयोग, महत्वाचं वाटणारं करियर आणि वैवाहिक जीवन यांची सांगड कशी घालायची ? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी काही तरुण-तरुणी चर्चेसाठी जमू लागल्या. विद्याताई बाळ आणि ' मिळून साऱ्याजणी ' मासिकाच्या परिवारातल्या जेष्ठ व्यक्तींबरोबर विचारविनिमय होऊ लागला. विवाहाविषयी विचार करण्यासाठी आणि जोडीदार निवडीची संधी देण्यासाठी या तरुण-तरुणींना एक व्यासपीठ मिळावं या हेतूनं १९९४ साली 'साथ-साथ विवाह मंडळ ' स्थापन झालं.

आनंददायी सहजीवनासाठी सुयोग्य जोडीदाराची निवड करता येणं महत्वाचं. त्यासाठी जोडीदार निवडीचे निकष विवेक आणि भावना यांची योग्य सांगड घालून ठरवता यायला हवेत. त्या आधी स्वतःची ओळख होणं गरजेचं आहे. स्वतःच्या क्षमता आणि कमतरतांची जाणीव,त्यांचा स्वीकार आणि सुधारणेचे,विकासाचे प्रयत्न करता येऊ लागले तर जीवनात नव्यानं येणाऱ्या व्यक्तीचा तिच्यातल्या क्षमता-कमतरतांसहित स्वीकार करणं अधिक सुलभ होतं . या साठी विवाहपूर्व मार्गदर्शनाची आणि गरज पडल्यास समुपदेशनाची सेवा उपलब्ध हवी हे लक्षात आलं . म्हणून १९९९ साली साथ साथ विवाह अभ्यास मंडळ आणि परिचयोत्तर विवाह संस्था अशा स्वरुपात संस्थेचं काम सुरू झालं. या कामात सुधा क्षिरे, वंदना कुलकर्णी, अनिल भागवत, लीना कुलकर्णी , उज्वला वाघ, कल्पना कुलकर्णी , शालिनी कुलकर्णी अशा कार्यकर्त्यांचा सहभाग होता. या कामाला अधिक गती यावी आणि विस्तार व्हावा म्हणून २ फेब्रुवारी २००७ रोजी रीतसर नोंदणी करून ' साथ-साथ चॅरिटेबल ट्रस्ट ' स्थापन झाला आणि त्या ट्रस्टच्या मार्गदर्शक तत्वांनुसार विवाह अभ्यासमंडळ आणि परिचयोत्तर विवाहसंस्थेचं काम सुरू झालं. साथ-साथ हे नुसतं वधुवर सूचक मंडळ नाही हे यावरून लक्षात येईल.

विवाह अभ्यासाची गरज आणि साथ-साथचं योगदान- एकविसाव्या शतकात आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक,सामाजिक बदलाचा वेग खूपच वाढला. त्याचे परिणाम वैयक्तिक ,कौटुंबिक , सामाजिक पातळीवर दिसू लागले . जीवनशैली बदलू लागली. कुटुंबजीवन अधिकाधिक पैसाकेंद्रित आणि व्यक्तिकेंद्रित होऊ लागलं. त्याचा परिणाम विवाहसंस्थेवरही दिसू लागला. व्यक्तींच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या तशाच जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा बदलल्या. स्त्री पुरुष समतेच्या विचारांचा स्वीकार होऊ लागला .स्त्री पुरुषांना कामानिमित्त आणि इतर कारणांनी एकत्र येण्याच्या परिचित होण्याच्या, मैत्री जुळण्याच्या संधी मिळू लागल्या परंतु पारंपरिक विचारांचा प्रभाव पूर्णपणे गेला नाही. पुरुषांना नोकरी-करियर करणारी बायको हवीशी वाटू लागली तसंच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या बायकांना घरकामात सहभागी होणारा नवरा हवासा वाटू लागला. नात्यांमधे उतरंड असण्यापेक्षा ती समपातळीवर आणि परस्परावलंबी असावीत असं वाटू लागलं. संसारात स्त्री-पुरुषांच्या भूमिका परंपरेने आखून दिल्यासारख्या राहिल्या नाहीत. या संदर्भात पालक आणि मुलं यांच्या विचारांतल्या तफावतीचा ताण विवाह जुळवताना आणि विवाह निभावताना जाणवू लागला. वैयक्तिक आशा आकांक्षा आणि त्यांची पूर्ती याचं महत्व नव्या पिढीला अधिकाधिक वाटू लागलं परंतु विवाह मात्र कुटुंबाच्या मान्यतेनं करायचीच गोष्ट राहिली. पूर्वापार चालत आलेल्या जात,धर्म,पत्रिका,वय,वजन, उंची,शिक्षण, पगार,प्रतिष्ठा,रूप या निकषांच्या आधारावर लग्न ठरवताना आतला ' माणूस ' कसा आहे ते बघायचं राहून जातं. सवयी, आवडीनिवडी, विचार,जीवनातल्या भावी योजना, अग्रक्रम हे जुळतंय का ते बघायचं राहून जातं आणि मग अपेक्षाभंगाची टोचणी आनंददायी सहजीवनातला अडसर बनून राहते , कधी विवाह मोडण्यापर्यंत मजल जाते. परिस्थिती आणि परिसर ज्या वेगानं बदलतो आहे त्याच्याशी जुळवून घेताना सर्वच नात्यांची विशेषतः नवरा बायकोच्या नात्याची ओढाताण होते आहे. विवाहाला ' लिव्ह इन रिलेशनशिपचा ' पर्याय निवडणारी मंडळीही
आजूबाजूला दिसताहेत. पटलं नाही तर परस्पर सहकार्यानं घटस्फोट घेणारी मंडळीही दिसत आहेत. विवाहविषयक कायदेही बदलत आहेत.अशा परिस्थितीतून विवेकानं, समन्वयानं मार्ग काढण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची , आवश्यकता पडल्यास तज्ञांचं मार्गदर्शन घेण्याची गरज भासते आहे. ही गरज भागविण्याचं काम साथ-साथ विवाह अभ्यासमंडळ करते. व्याख्यानं, गटचर्चा, रोल प्ले , आनंदी सहजीवन साधलेल्या जोडप्यांबरोबर गप्पा,वैयक्तिक मार्ददर्शन असे अनेक उपक्रमा असतात. त्यातून स्वओळख,जोडीदाराविषयी रास्त अपेक्षा, जोडीदाराची डोळस निवड,बदलत्या परिस्थितीचे आपल्या कुटुंब जीवनावर होणारे परिणाम या गोष्टींची जाण वाढते. विवाहासाठी लागणारी शारीरिक,भावनिक,बौध्दिक,सामाजिक कौशल्यं आणि अर्थार्जन, आर्थिक नियोजनाची कौशल्यं आपल्याकडे आहेत का ? याबद्दल आत्मपरीक्षण करता येतं. चांगला जोडीदार मिळण्याची अपेक्षा करताना स्वतःला चांगला जोडीदार म्हणून घडवणं महत्वाचं आहे हे जाणवतं. हाच विवाह अभ्यास. तो करण्यासाठी साथ-साथच्या सदस्यांनी या कार्यक्रमांत नियमितपणे सक्रीय सहभाग घेणं आवश्यक असतं.

परिचयोत्तर विवाहाची संकल्पना- ज्या व्यक्तींना परिचयातून आपापला किंवा प्रेमविवाह जमवता आला नाहीये किंवा तशी संघी मिळालेली नाहिये त्यांना ' दाखवून बघून ' अरेंज्ड मॅरेज करण्याला पर्याय नसतो. आता इंटरनेटवरून शोध घेण्याचा पर्याही आहे. परंतु सामान्यपणे या सगळ्या पध्दतींत पालकांचा, नातेवाईकांचा सहभाग विवाहेच्छू मुलामुलींपेक्षा अधिक असतो. ही स्थिती आता अनेकांना आवडत नाही, गैरसोयीची आणि कालबाह्य वाटते. म्हणून परिचयोत्तर विवाह या नव्या पध्दतीची माहिती आणि परस्पर परिचयाची संधी विवाहेच्छू मुलामुलींना साथ-साथ मधे दिली जाते. साथ साथच्या कार्यक्रमांना नियमित येण्यातून नव्या ओळखी होतात. सहली, सिनेमा-नाटक-साहित्य यावरच्या आणि परिस्थितीजन्य विषयांवरील गटचर्चा, रोलप्ले या माध्यमांतून अनौपचारिक पध्दतीनं मुलामुलींचा परिचय होतो. स्वतःचा सविस्तर परिचय करून देणारा आणि अपेक्षा व्यक्त करण्यासाठीचा साथ-साथचा फॉर्म प्रामाणिकपणे ,विचारपूर्वक भरल्यामुळे इतरांना स्वतःची ओळख करून देण्याचं कौशल्यं शिकता येतं, आपल्याच विचारात स्पष्टता येण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच मुद्द्यांप्रमाणे दुसऱ्यांशी ओळख करून घेण्याची संधी घेता येते. पुढे मैत्रीच्या आधारवर एकमेकांच्या कुटुंबाचा परिचय करून घेता येतो आणि जोडीदार म्हणून एखादी व्यक्ती योग्य आहे का नाही त्याची पडताळणी घेता येते. या ओळख करून घेण्याच्या प्रक्रियेला ३ ते ६ महिन्यांचा अवधी घेण्यासाठी साथ-साथ संस्थेची मदत होते. मग जोडीदार म्हणून आपला प्रस्ताव त्या व्यक्तीपुढे ठेवता येतो. यात होकार किंवा नकार येण्याच्या शक्यता असतात हे साथ साथच्या अभ्यास-कार्यक्रमांतून जाणवलेलं असतं. होकार-नकार देण्याच्या होकार-नकार पचविण्याच्या समजुतदार पध्दतींचीही जाण वाढलेली असते. या सगळ्या प्रयत्नांमुळे साथ-साथमधून जोडीदार मिळवायला मदत होते तशी इतर पध्दतींतून सामोऱ्या येणाऱ्या व्यक्तींतून जोडीदाराची निवड करण्यासाठीही मदत होते. अर्थात या सगळ्या प्रक्रियेसाठी ,प्रयत्नांसाठी वेळ आणि कौशल्यांची गुंतवणुक करावी लागते. आपण हव्या त्या कोर्सला प्रवेश मिळविण्यासाठी जर १-२ वर्षं देत असू तर जन्माचा जोडीदार मिळविण्यासाठी अशी गुंतवणुक करायला हवी नाही का ! साथ साथ मदतीला आहेच.